
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या रसिकांसाठी अभिजात संगीताची पर्वणी सजली आहे. सुप्रसिद्ध ITC संगीत रिसर्च अकादमी, कोलकाता आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मिनी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, हे संमेलन १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात संध्याकाळी ७ ते १० या वेळेत पार पडणार आहे. अभिजात संगीतात रस असलेल्या कान्हदेशातील श्रोत्यांसाठी ही एक दुर्मिळ संधी ठरणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान हे गेल्या २३ वर्षांपासून बालगंधर्व संगीत महोत्सवाद्वारे जळगावला राष्ट्रीय स्तरावर अभिजात संगीताच्या नकाशावर स्थान मिळवून देत आहे. देशभरातील अनेक प्रतिष्ठित संस्थांसह या संस्थेचे कलात्मक सहकार्य (कोलॅबोरेशन) आहे. त्याच परंपरेत आता कोलकात्याच्या ख्यातनाम ITC संगीत रिसर्च अकादमीसोबत झालेले हे सहकार्य अभिजात संगीत रसिकांसाठी नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे.
या संगीत संमेलनाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि ITC चे गुरु पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संगीत सोहळ्यात ITC अकादमीचे दोन स्कॉलर विद्यार्थी आणि दोन प्रख्यात कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
प्रथम दिवशीच्या सत्रात स्कॉलर कौस्तव रॉय यांचे सरोद वादन सादर होईल, त्यांना तबल्यावर रमेंद्र सिंग सोलंकी साथ करतील. त्यानंतरच्या सत्रात ITC अकादमीचे गुरु आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पं. ओंकार दादरकर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना तबल्याची साथ युवा तबला वादक तेजोवृष जोशी आणि संवादिनीची साथ अनंत जोशी करणार आहेत.
दुसऱ्या दिवशीच्या सत्राची सुरुवात जळगावच्या युवा कलाकार नुपुर चांदोरकर-खटावकर आणि आर्या शेंदुर्णीकर यांच्या कथक नृत्य व गुरुवंदनेने होईल. यानंतर स्कॉलर अनुभव खामारू शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी आणि संवादिनीवर अनंत जोशी देतील. या सत्रानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे.
पत्रकार परिषदेत या संमेलनाची माहिती दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर आणि नुपूर खटावकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “जळगावमध्ये अभिजात संगीताची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक आहे. ITC संगीत अकादमीसारख्या संस्थेचे सहकार्य ही जळगावसाठी अभिमानाची बाब आहे.”



