
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारी एकूण १७१ पदे भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम २०११ आणि त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा तसेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन आदेशानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
आरक्षण आणि अर्ज करण्याची प्रक्रिया:
भरतीमध्ये नियमानुसार आवश्यक असलेले आरक्षण लागू करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत २९ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार असून, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचे आहेत.
पोलीस शिपाई पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक ती सर्व माहिती भरून, विहित मुदतीपूर्वी संबंधित संकेतस्थळावर policerecruitment2025.mahait.org आणि (www.mahapolice.gov.in) आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. या भरतीमुळे जिल्हा पोलीस दलाला अधिक बळकटी मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराची चांगली संधी प्राप्त झाली आहे. या भरती प्रक्रियेसंबंधीची सविस्तर माहिती आणि सूचना उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर पाहून त्यानुसार अर्ज करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.



