Home उद्योग महावितरण अभियंत्यांच्या हलगर्जीमुळे शेतकरी सोलर योजनेपासून वंचित

महावितरण अभियंत्यांच्या हलगर्जीमुळे शेतकरी सोलर योजनेपासून वंचित


पहूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथील बारा शेतकऱ्यांना सोलर योजनेसाठी अर्ज केले होते, मात्र महावितरण कंपनीच्या अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे कनेक्शन दाखविल्यामुळे, सोलर कंपनीने या शेतकऱ्यांना सोलर पॅनेल देण्यास नकार दिला आहे. या बाबतीत संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

गेल्या वर्षी अर्चना विरेंद्र कुमावत, वीरेंद्र शिवाजी कुमावत, महेश घोलप यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सोलर पॅनेलसाठी अर्ज केला आणि संबंधित सोलर कंपनीला रक्कम भरली. मात्र, महावितरणच्या पहूर येथील अभियंत्याने ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरल्याने शेतकऱ्यांना सोलर योजना मिळवण्यास अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांना दाखविण्यात आले की, त्यांच्या शेतात आधीच विजेचे कनेक्शन आहे, म्हणून त्यांना सोलर योजनेचा लाभ मिळणार नाही.

यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी भुसावळ, जळगाव येथील वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली होती, पण त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार केली आहे. त्यांची मागणी आहे की, त्यांना त्वरित सोलर पॅनेल मिळावे आणि त्यांची भरलेली रक्कम परत मिळावी.

शेतकरी वीरेंद्र शिवाजी कुमावत यांनी सांगितले की, “माझ्या कडून सोलर पॅनेलसाठी पूर्ण रक्कम भरली आहे. महावितरणच्या अभियंत्यांनी चुकीची माहिती भरून आम्हाला सोलर पॅनेल मिळण्यास अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे, ना आम्हाला सोलर मिळाले, ना आमची रक्कम परत मिळाली.”


Protected Content

Play sound