
जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तोंडापूर परिसरात विषारी रसायने व केमिकल्सची बेकायदेशीर पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन, पाणी आणि पर्यावरण प्रदूषित केल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील पर्यावरण सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

याप्रकरणी तोंडापूर भागाचे मंडळ अधिकारी प्रशांत साहेबराव सांडू (वय ४२, तहसील कार्यालय जामनेर) यांनी पहूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शेख हसन शेख सांडू (रा. तोंडापूर, ता. जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक १६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपासून तोंडापूर परिसरात विषारी पदार्थ व केमिकल्स प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून टाकण्यात आल्याचा आरोप आहे. या रसायनांमुळे जमिनीची गुणवत्ता खराब होण्याबरोबरच परिसरातील जलसाठे दूषित झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना वाकोद शिवारातील गट क्रमांक २५३/२, तोंडापूर शिवारातील धरणाकडील मागील भाग तसेच ढालसिंगी शिवारातील गट क्रमांक ११८/२ मधील शेतजमिनीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणी टाकण्यात आलेल्या विषारी रसायनांमुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २७१, २७२, २७९, २८० आणि २८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांना धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया १८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटांनी पूर्ण करण्यात आली. घटनास्थळ हे पहूर पोलीस स्टेशनपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकरणाचा तपास पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करत आहेत. संबंधित ठिकाणांची पाहणी, रसायनांचे स्वरूप, त्याचा पर्यावरणावर झालेला परिणाम आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.



