Home उद्योग श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जगदिश कवडीवाले यांची बिनविरोध निवड

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जगदिश कवडीवाले यांची बिनविरोध निवड

0
9


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता जगदिश रत्नाकर कवडीवाले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बँकेचे मावळते अध्यक्ष हेमंत एकनाथ चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी बुधवार, दिनांक १७ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत जगदिश कवडीवाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी जगदिश रत्नाकर कवडीवाले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अध्यासी अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या विशेष सभेला संस्थेचे मावळते अध्यक्ष हेमंत चौधरी, माजी अध्यक्ष शरद यावलकर, उपाध्यक्ष उमेश कवडीवाले, महेश वाणी, दिलीप नेवे, यशवंत सोनवणे, तेजस यावलकर, नितीन हडपे, तज्ज्ञ संचालक गणेश बुरुजवाले, सुनीता गडे तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाणी उपस्थित होते.

या निवड प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून यावल येथील सहाय्यक निबंधक अच्युत भागानगरे यांनी काम पाहिले. त्यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. नूतन अध्यक्ष जगदिश कवडीवाले यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बँकेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. संचालक मंडळ, सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत मिळालेल्या संधीचे सोने करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देणे, संस्थेची प्रगती साधणे आणि बँकेची विश्वासार्हता अधिक मजबूत करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. जगदिश कवडीवाले यांच्या बिनविरोध निवडीमुळे बँकेच्या नेतृत्वाला नवी दिशा मिळाली असून सभासद आणि संचालक मंडळाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


Protected Content

Play sound