मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राजकारणात नवा श्वास घेऊन येण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली असून, पक्षात राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या ५० टक्के तरुणांना उमेदवारी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, जुन्या राजकीय चौकटीबाहेर विचार करणाऱ्या युवकांसाठी हा एक मोठा बदल ठरणार आहे.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या निर्णयाची अधिकृत घोषणा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जास्तीत जास्त तरुणांना उमेदवारी द्या, अशा स्पष्ट सूचना पवारांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिल्या. याच बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीबाबत उद्या होणाऱ्या महत्त्वाच्या चर्चेची माहितीही दिली. पवारांनी पुढे सांगितले की, इच्छुकांची संख्या मोठी असली तरी काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल आणि अल्पसंख्याक समाजासाठी घेतला निर्णय युवक-युवतींसाठीही लागू केला जाईल.

पक्षातील पदाधिकाऱ्यांना पवारांनी जाती-धर्माच्या राजकारणापासून दूर राहण्याचा इशारा दिला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना, त्यांनी संग्राम जगताप यांच्या विधानाचा निषेध केला आणि पूर्वी राष्ट्रवादीत असलेल्या एका आमदारावरही ताशेरे ओढले. जातीय सलोखा टिकवण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राची परंपरा ही समतेची आहे आणि जाती-धर्माच्या आधारावर मतं मागणं किंवा वाद निर्माण करणं हे निंदनीय आहे. बोलताना प्रेमाची भाषा वापरणं गरजेचं असून, आपली वक्तव्ये समाजात फूट न पाडणारी असावीत, असंही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
सरकारच्या धोरणांवर आणि धोरणात्मक गोंधळावर टीका करताना, शरद पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर सरकारला धारेवर धरलं. त्यांनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीला “तुटपुंजी” अशी संज्ञा देत, केंद्र सरकारनेही यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी केली. आपल्या कार्यकाळातील उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारचे पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी येत असे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मदतीचा निधी दिला जात असे. मात्र, आजच्या सरकारकडून ती तत्परता आणि संवेदनशीलता दिसून येत नसल्याचं त्यांनी ठसठशीतपणे नमूद केलं.



