शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर घेतोय मोकळा श्वास


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ मधून खाजगी वाहनांना प्रवेशबंदी लागू करून आठवडा उलटला आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या पुढाकाराने राबवलेल्या या निर्णयामुळे परिसरात आता शिस्त आणि शांतीचे वातावरण निर्माण झाले असून, रुग्णालयाने जणू मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालय परिसरातील बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या बनली होती. डॉक्टर, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे रुग्णांना वेळेत उपचार विभागात पोहोचणे कठीण झाले होते. काही वेळा रुग्णवाहिकेलाही गेटपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तसेच, पार्किंगच्या कारणावरून सुरक्षारक्षकांशी नागरिक आणि काही राजकीय कार्यकर्त्यांमध्ये वाद घडत होते. या सर्व गोंधळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून अधिष्ठात्यांनी कडक निर्णय घेत, गेट क्रमांक १ वरून खाजगी वाहनांना पूर्णतः बंदी घातली आहे.

रुग्णालय प्रशासनाने तयार केलेल्या नव्या ‘एसओपी’नुसार केवळ आपत्कालीन वाहनांनाच गेट क्रमांक १ मधून प्रवेश दिला जात आहे. यात रुग्ण आणणाऱ्या रुग्णवाहिका, आरोपींसह पोलीस वाहन, जखमी रुग्ण घेऊन येणारी खाजगी वाहने आणि शववाहिका यांचा समावेश आहे. इतर सर्व वाहने गेट क्रमांक ३ कडे वळविण्यात आली असून तेथे अधिकृत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर परिसरातील अनावश्यक गर्दी पूर्णपणे कमी झाली आहे. गेट क्रमांक १ जवळ आता दोन्ही बाजूंना लहान पादचारी गेट बसविण्यात आले असून, पायी येणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात आला आहे. सुरक्षारक्षकांना दररोज काही नागरिकांच्या आक्षेपांना सामोरे जावे लागते, तरीही वाहनांना आत प्रवेश देत नाहीत, ही बाब प्रशंसनीय ठरत आहे. अधिष्ठात्यांनी सुरक्षारक्षकांच्या दक्षतेचे विशेष कौतुक केले असून, ही शिस्त पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सध्या रुग्णालय परिसरात शांतता, स्वच्छता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आता हॉस्पिटल परिसरात सहज हालचाल करणे शक्य झाले आहे. वाहने काढल्यानंतर संपूर्ण परिसर अधिक स्वच्छ आणि खुला वाटू लागला आहे. प्रशासनाच्या या कडक निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले असून, तो दीर्घकाळ टिकवावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.