जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळी तोंडावर आली असतानाही एसटी प्रशासन आणि राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कोणताही दिलासा मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, संयुक्त कृती समितीच्या वतीने रविवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता शहरातील नेरी नाका येथील विभागीय कार्यशाळेच्या गेटवर जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत द्वारसभा घेऊन जनजागृती सुरू करण्यात आली.
यावेळी एसटी कामगार सेनेचे केंद्रीय पदाधिकारी आर. के. पाटील यांनी विविध समस्यांवर सविस्तर खुलासा केला. त्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांची सन २०१६ पासून प्रलंबित असलेली वेतन वाढ, घर भाडे भत्ता, तसेच सन २०१८ पासून प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक आणि २०२० ते २०२४ या चार वर्षांचा वेतनवाढीचा फरक सरकारने तात्काळ देणे अत्यंत गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी संयुक्त कृती समितीमार्फत येत्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथे मोठे आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही द्वारसभा घेण्यात आली. यावेळी गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर अनिल कदम, दिनेश महाशब्द, सुनील नन्नवरे, प्रशांत चौधरी, विलास सोनवणे आणि प्रदीप दारकुंडे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले.




