Home प्रशासन नगरपालिका बोदवडमध्ये अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह ; ठराविक दुकानदारांवरच कारवाईचा आरोप 

बोदवडमध्ये अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह ; ठराविक दुकानदारांवरच कारवाईचा आरोप 

0
8

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावत कारवाईची प्रक्रिया सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात निवडक दुकानदारांवरच कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते आणि चौक आजही अतिक्रमणाच्या विळख्यात असताना सर्वांवर समान निकषाने कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

नगरपंचायतीने सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावल्या असून, नोटिशीत निर्धारित मुदतीत अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. मात्र, नोटिसा बजावूनही शहरातील अनेक भागांमध्ये अतिक्रमण आजही कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नोटिशीतील कारवाई प्रत्यक्षात कधी आणि कोणावर होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. गांधी चौक, जामठी रस्ता, जामनेर रस्ता, भुसावळ रस्ता तसेच मुक्ताईनगर रस्ता या शहरातील प्रमुख मार्गांवर अनेक ठिकाणी दुकाने, टपऱ्या, हातगाड्या आणि इतर अतिक्रमणांमुळे सार्वजनिक जागा व्यापल्या गेल्या आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील या अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या मते, काही मोजक्या व्यावसायिकांवर कारवाई करून इतर अतिक्रमणधारकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडून कारवाईत दुजाभाव केला जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान असावा, अशी मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली आहे. “फक्त निवडक दुकानदारांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. सार्वजनिक रस्ते आणि जागा सर्वांसाठी खुल्या राहाव्यात यासाठी शहरातील प्रत्येक अतिक्रमणावर समान आणि निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound