जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेच्या घामातून उभी राहिलेली दगडी बँक ही संस्था म्हणजे जळगावातील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक मानली जाते. मात्र, सद्यस्थितीत या बँकेच्या इमारतीची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय छावा संघटनेने या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून, जर हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात आला नाही, तर छावा स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा उपनिबंधक, जळगाव यांना सादर केलेल्या निवेदनात छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भिमराव मराठे यांनी म्हटले आहे की, जे.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी कोणतीही पारदर्शकता न ठेवता आणि जनतेला विश्वासात न घेता ही विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांनी जनतेच्या भावनांशी गद्दारी केली आहे. दगडी बँकेने कुठलेही कर्ज घेतलेले नाही, इमारतीवर कोणताही आर्थिक बोजा नाही, तसेच बँकेचे कामकाजही सुरळीत सुरू आहे, मग अशा स्थितीत इमारत विकण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवालही मराठे यांनी उपस्थित केला.

छावा संघटनेने यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय यांनाही निवेदन पाठवले आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जर हा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर छावा संघटना शेतकरी व सामान्य जनतेला सोबत घेऊन मोर्चा, घेराव, निदर्शने तसेच अध्यक्ष व संचालक मंडळाच्या घरीही आंदोलन उभारेल. इतकेच नव्हे तर हा लढा राज्यव्यापी करण्याची तयारीही असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दगडी बँकेविषयी नागरिकांमध्ये एक भावनिक नाळ जोडलेली आहे. ती केवळ एक बँक न राहता जनतेच्या इतिहासाचे, संघर्षाचे आणि सहकारातील यशाचे प्रतीक बनली आहे. त्यामुळे तिची विक्री ही जनतेच्या भावनांवर आघात असून, अशा निर्णयांना जळगावातील समाज आणि संघटना कदापि सहन करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.



