
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील २४७ नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, काल मुंबईतील मंत्रालयात झालेल्या सोडतीत यावल नगर परिषदच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी जाहीर करण्यात आले. या निर्णयामुळे यावलच्या राजकारणात नव्या समीकरणांची आणि चर्चेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आता थेट इच्छुकांच्या पत्नीच उतरतील, अशी जोरदार शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून यावल नगर परिषद निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठीची तयारी करणाऱ्या नेत्यांसाठी ही सोडत एकप्रकारे ‘गेम चेंजर’ ठरली आहे. आतापर्यंत ज्यांनी स्वतःची राजकीय भूमिका भक्कम केली होती, त्यांना आता आपले राजकारण पत्नीकडून पुढे नेण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यामुळे यावलच्या राजकारणात स्त्री नेतृत्वाची पहिली मोठी चाचणी येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
सध्या चर्चेत असलेल्या संभाव्य उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या पत्नी सौ. छाया पाटील, सामाजिक कार्यकर्ते नितीन महाजन यांच्या पत्नी सौ. निलीमा महाजन, तसेच माजी नगरसेवक व भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांच्या पत्नी सौ. रोहिणी फेगडे यांच्या नावांचा सर्वाधिक उच्चार केला जात आहे. यापैकी कोण नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. अनेकांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या, स्थानिक विकासकामांमध्ये लक्ष घातलं, आणि आपली उपस्थिती दाखवून दिली. मात्र आता आरक्षण महिलांसाठी निश्चित झाल्याने ही संपूर्ण राजकीय गणितं नव्याने आखावी लागणार आहेत. राजकीय घराण्यांची पत्नी आता निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीला वेगळा रंग चढण्याची शक्यता आहे.
सध्या यावलमध्ये सर्वपक्षीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. इच्छुक नेत्यांच्या कुटुंबातील महिला पुढे येत असून, त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा उभारली जात आहे. स्थानिक पातळीवर ‘बाहेरचा उमेदवार नको’ आणि ‘स्थानिक चेहरा हवा’ या भावना प्रबळ असून, प्रत्येक गट आपली बाजू अधिक ठामपणे मांडण्याच्या तयारीत आहे.



