जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या सहा फेऱ्या पार पडूनही अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. “गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा!” या शब्दांत शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांनी सरकारला लक्षवेधी इशारा दिला आहे.
शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील ११ वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून सहा प्रवेश फेऱ्या पार पडल्या आहेत. तरीदेखील अनेक विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. मिरीट प्रणालीद्वारे केलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. प्राप्त अर्जांची संख्या आणि अस्तित्वात असलेल्या तुकड्यांची संख्या यामध्ये तफावत असल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गुलाबराव वाघ यांनी स्पष्टपणे सांगितले की, सरकार ‘मागेल त्याला शिक्षण देऊ’ असे म्हणत असताना प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. दुसरीकडे, राजकीय नेते मात्र पक्षप्रवेशासाठी गल्लोगल्ली फिरत आहेत. शिक्षणाच्या गंभीर प्रश्नाकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही, असा आरोप त्यांनी केला.
धरणगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयांचीही अशीच परिस्थिती असून तिथेही अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी धडपडत आहेत. याच विषयावरून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नाशिक येथील शिक्षण उपसंचालक राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम, सहाय्यक शिक्षणाधिकारी ईजाज शेख, तसेच प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे यांच्याशी चर्चा केली. जळगाव येथे विद्यार्थ्यांच्या व्यथा आणि अडचणी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर लवकरच यावर तोडगा न काढल्यास युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस जिल्हा प्रशासन व राज्य शासन जबाबदार असेल. या बैठकीस कुलभूषण पाटील, शरद तायडे, युवासेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी, निलेश चौधरी, विराज कावडिया, विशाल वाणी, प्रमोद घगे, गुलाब कांबळे, योगेश चौधरी, योगेश पाटील, सचिन चौधरी, दीपक बडगुजर, किरण ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



