
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे फोटो तरुणीच्या मैत्रिणीने आणि तिच्या प्रियकरानेच व्हायरल करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा संशय कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणारी २१ वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शाळेत असताना तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही बाब तिच्या बहिणीला समजल्यावर तिने त्या तरुणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा प्रकार त्या तरुणाला कळताच, त्याने तरुणीला रस्त्याने जाताना, ‘आमच्याकडे आली नाहीस तर तुला रिक्षाने उडवून टाकेन’ अशी धमकी दिली होती. तरुणीच्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता.
तरुणीची बहीण शिक्षणासाठी बाहेरगावी असताना, तिला २२ जुलै रोजी एका अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या बहिणीचे तरुणासोबतचे फोटो आले आणि त्याबद्दल उलटसुलट माहिती दिली गेली. याबाबत तरुणीने आपल्या बहिणीला विचारले असता, तिलाही असेच फोटो आले असून, त्या व्यक्तीकडून पैशांची मागणी होत असल्याची आणि पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी मिळाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तरुणीच्या भावालाही हेच फोटो आल्याने त्याने संबंधिताची चौकशी केली.
फोटो व्हायरल झाल्यामुळे आलेल्या तणावातूनच तरुणीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तरुणीच्या लॅपटॉपमध्ये तिच्या मैत्रिणीचे आणि तिच्या प्रियकराचे फोटो व व्हिडिओही पोलिसांना मिळाले आहेत. २०२४ मध्ये तरुणीने एका व्यक्तीला पाच हजार रुपये ऑनलाइन पाठवले होते आणि तोच तिला ब्लॅकमेल करत असल्याचा संशय तरुणीच्या कुटुंबियांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.
तरुणीच्या मैत्रिणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने तरुणीचे प्रियकरासोबत असलेले फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या केली असून, याप्रकरणी तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित सुबोध शिरसाठ (वय २१, रा. संभाजी नगर), तरुणीची मैत्रीण आणि तिचा प्रियकर रोहित किरण हिवराळे (रा. वाटिका आश्रम) या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहेत.



