जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड येथील १९ वर्षीय हर्षल राजू पाटील या तरुणाचा शनिवारी १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर मित्र कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड ता.धरणगाव) गंभीर जखमी झाला होता. या घटने प्रकरणी बुधवारी २३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात डंपर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हर्षल पाटील हा आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत वराड गावात राहत होता. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारुती मंदिरात दर शनिवारी जिल्ह्यासह बाहेरून अनेक भाविक दर्शनासाठी जात असतात. याच परंपरेनुसार, हर्षल पाटील गावातील ८ ते १० मित्रांसोबत दुचाकी क्रमांक एमएच १९ इजे ०००३) ने शनिवारी पहाटे शिरसाळ्याला दर्शनासाठी निघाला होता. त्याच्या दुचाकीवर त्याचा मित्र कुणाल पाटील होता.

सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावरून जात असताना, एका भरधाव डंपर क्रमांक (एमएच १६ एइ ६४११) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात हर्षल पाटील जागीच ठार झाला, तर कुणाल पाटील गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या कुणाल वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात बुधवारी २३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता डंपरवरील अज्ञान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए सी मनोरे करीत आहे.



