जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भोईटे नगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे उघड झाले असून, या घटनेत पीडित मुलीच्या आईचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात बुधवार, २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भोईटे नगर परिसरातील १७ वर्षीय पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पीडित मुलगी आणि तिची आई घरी असताना, संशयित आरोपी मयूर रमेश शिंपी (रा. कांचन नगर) हा पीडित मुलीच्या घरी आला. त्यावेळी त्याने मुलीसोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर, आईने तिला ‘उगाच काही सांगू नकोस’ असे म्हणत दुर्लक्ष करण्यास सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे, हाच प्रकार पुन्हा २८ फेब्रुवारी आणि १२ जून रोजी देखील घडला. त्या वेळीही संशयित आरोपी मयूर शिंपीने पीडित मुलीचे हात पकडून विनयभंग केला. प्रत्येक वेळी पीडित मुलीच्या आईने आरोपीच्या कृत्याला समर्थन दिल्याचे समोर आले आहे. अखेर, पीडित मुलीने हा सर्व प्रकार जळगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांना सांगितला.
तिने दिलेल्या फिर्यादीवरून तिची आई आणि संशयित आरोपी मयूर रमेश शिंपी (रा. कांचन नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर हे करीत आहेत. या घटनेमुळे समाजात खळबळ उडाली असून, एका आईनेच आपल्या मुलीच्या संरक्षणाऐवजी आरोपीला पाठिंबा दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.



