जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावात आज १८वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्वर्गीय कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. विविध सामाजिक आणि साहित्यिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाने जळगावात एक वेगळीच साहित्यिक रंगत आणली.
कविवर्य पुरुषोत्तम नारखेडे साहित्य नगरी, सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे भरवण्यात आलेल्या या साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू मामा भोळे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी हजेरी लावली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक डॉ. फुला बागुल होते. संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीतून झाली, ज्यामध्ये विविध साहित्य संघटना, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी भाग घेतला. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि बहिणाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक अमित भाऊ काळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भाऊ भंगाळे, माजी संमेलनाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे, स्वागताध्यक्ष पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुळे, तुषार वाघुळदे, डॉ. विलास नारखेडे, लीलाधर नारखेडे, रघुनाथ राणे, डॉ. संजय पाटील, निवृत्त डीवायएसपी राजेंद्र रायसिंग, निवृत्त प्राचार्य नीलकंठ गायकवाड, सेवा संघ अध्यक्ष प्रदीप भोळे, बहिणाबाई स्मारक समितीचे किशोर चौधरी, ज्येष्ठ साहित्यिक बी.एन. चौधरी आदींचा समावेश होता. समारंभाचे अध्यक्षपद पौर्णिमा हुंडीवाले यांनी भूषवले.
या संमेलनात खासदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना “बहिणाबाई सोपानदेव मालतीकांत जीवन गौरव पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार शैलेंद्र ठाकूर यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी विशेष सन्मान देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याने संमेलनाला विशेष वैभव प्राप्त झाले.
या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाद्वारे खानदेशातील समृद्ध साहित्यिक परंपरेचा प्रभावी जागर करण्यात आला. नवोदित आणि ज्येष्ठ साहित्यिकांना एकत्र आणणारे हे व्यासपीठ म्हणजे खानदेशाच्या सांस्कृतिक जीवनात एक महत्त्वाचा अध्याय ठरला. या संमेलनामुळे मराठी साहित्याची सामाजिक ओळख अधिक व्यापक होत असून, नव्या लेखकांना प्रेरणादायी ठरत आहे.



