Home धर्म-समाज गुरुतत्त्व म्हणजे जीवनाचा प्रकाशमार्ग – जनार्दन हरीजी महाराज

गुरुतत्त्व म्हणजे जीवनाचा प्रकाशमार्ग – जनार्दन हरीजी महाराज


 फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने फैजपूर येथे आयोजित सत्संग महोत्सवात महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराजांनी गुरुतत्त्वाचे महत्त्व सांगताना मनाला भिडणारा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, गुरु हा केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे — एक असा रस्ता, जो आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवतो आणि जीवनात शुद्ध, सकारात्मक विचारांची बीजं पेरतो.

महाराज म्हणाले की, “गुरूंसोबत जोडलं जाणं म्हणजे चांगल्या विचारांसोबत जोडलं जाणं. जसं फुलं तोडणाऱ्यालाही सुगंध लागतो, तसंच गुरुतत्त्व हे निंदा करणाऱ्यालाही, स्तुती करणाऱ्यालाही समतेने योग्य दिशा दाखवतं.” त्यांनी आपल्या गुरू ब्रह्मलीन जगन्नाथजी महाराज यांच्या स्मृतींना उजाळा देताना भावुक होत, शिष्यांनी गुरूंच्या विचारांचा स्वीकार करून चारित्र्य निर्माण करण्यासाठी अखंड प्रयत्न करावेत, असे सांगितले.

७ ते ९ जुलै या कालावधीत फैजपूरच्या सतपंथ मंदिरात ‘आगम चरित्र’ ग्रंथाचे पारायण करण्यात आले. १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त कळस महापूजा, पादुका पूजन आणि दीक्षादान विधीचे आयोजन करण्यात आले. पूजनानंतर वढोदा येथील निष्कलंक धाम येथे भव्य सत्संग सोहळा पार पडला. प्रारंभी श्री मनोज भाई व सौ. भूमिबेन पटेल यांच्या हस्ते जनार्दन हरीजी महाराज यांचे पाद्यपूजन करण्यात आले. पंडित श्रीकांत रत्नपारखी यांच्या वैदिक मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण पवित्रतेने भारले गेले.

गुरु पौर्णिमा कार्यक्रमात एकदंत महाराजांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “गुरु ही ज्ञानाची मूर्ती आहे. शिष्याने ज्ञानासाठी गुरूशी नातं ठेवावं. श्रद्धा, समर्पण आणि निःस्वार्थी भाव ही या नात्याची खरी ताकद आहे.” त्यांनी अहंकार, राग, द्वेष हे गुरुचरणी सोडून ज्ञानमार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते भक्तांनी आपली गुरुभक्ती आणि कृतज्ञता व्यक्त केली. श्री जयेशभाई पटेल, कु. शिवानी मोरे यांनी आपले अनुभव सांगितले तर अनिता सपकाळे यांनी भावपूर्ण गुरुभजन सादर केले. यावेळी निळकंठ जगन्नाथ गोशाळेसाठी दक्षिण गुजरात सतपंथ समाज मंडळाकडून मदत निधी दिला गेला. तसेच रंजनकाकी यांच्यातर्फे तुलसी हेल्थ केअर मधील महिला सेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला, ज्यात हजारो भक्तांनी सहभागी होऊन गुरुपौर्णिमेचे दिव्यत्व अनुभवले.


Protected Content

Play sound