Home Cities धरणगाव वीज समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू: शिवसेनेचा इशारा!

वीज समस्या सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू: शिवसेनेचा इशारा!


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहर आणि परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून विजेच्या लपंडावामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दिवसा आणि रात्री वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जनजीवन, व्यापार आणि उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने यावर आवाज उचलत, आठ दिवसांत समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. याबाबत महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून धरणगावमधील अनेक भागांत दोन ते तीन तास वीज गायब राहत आहे. यामुळे दैनंदिन कामे खोळंबली असून, विशेषतः विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाले असतानाही, विजेअभावी झेरॉक्स काढणे किंवा ऑनलाइन कामे करणे शक्य होत नाहीये. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.

नुकत्याच बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबतही ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. हे मीटर अवाजवी बिले दाखवत असल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. आधीच अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकरी आणि कष्टकरी संकटात सापडले असताना, विजेच्या समस्येने त्यांच्यावर आणखी ‘सुलतानी संकट’ लादल्यासारखे झाले आहे. वीज वितरण कंपनीचे ठेकेदारही वेळेवर आणि चांगले काम करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या सर्व समस्यांमुळे नागरिक संतप्त झाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रशासनाला आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. या कालावधीत वीजपुरवठ्याची समस्या सुधारली नाही, तर जनता, शेतकरी आणि पक्ष न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound