Home Cities जळगाव गोदावरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कमाल; २८ हजारात ई-स्कूटरची निर्मिती!

गोदावरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कमाल; २८ हजारात ई-स्कूटरची निर्मिती!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरणपूरक आणि किफायतशीर वाहनांची गरज वाढत असताना, जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या यांत्रिक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी केवळ २८,००० रुपये इतक्या कमी खर्चात एक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक स्कूटर यशस्वीरित्या डिझाईन आणि फॅब्रिकेट केली आहे.

‘डिझाईन अँड फॅब्रिकेशन ऑफ इलेक्ट्रिक स्कूटर’ या शीर्षकाखाली हा प्रकल्प भाग्यश्री दिलीप विसपुते, नीरज संजय हिंगणे, वैभव दिगंबर पाटील, सुमेध प्रशांत देशमुख, योगेश गणेश पाटील, आणि भूपेश विजय पाटील या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. ही ई-बाईक २५ किमी/तास वेगाने धावते आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ३० किमी अंतर पार करू शकते. ही स्कूटर प्रदूषणमुक्त असून तिची देखभाल करणेही सोपे आहे, ज्यामुळे ती शहरी भागातील कमी अंतराच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी सोपी आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर रचना तयार केली आहे. ई-बाईकचे डिझाईन CATIA या सॉफ्टवेअरचा वापर करून करण्यात आले, त्यानंतर डिझाईनचे सिम्युलेशन करून प्रत्यक्ष फॅब्रिकेशन करण्यात आले. विशेष म्हणजे, या स्कूटरसाठी लागणारी बॅटरी युनिट देखील विद्यार्थ्यांनी स्वतःच तयार केली आहे. यात ६००० mAh क्षमतेच्या लिथियम आयर्न सेलचा समावेश असून, चाचणीनंतर ती यशस्वीरित्या वापरण्यात आली आहे. काही घटक (जसे की फायबरचे पार्ट्स) थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आले आहेत.

या विद्यार्थ्यांच्या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. तुषार कोळी आणि प्रा. किशोर एम. महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमामुळे स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक वाहन निर्मितीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound