छत्रपती शाहू जयंतीनिमित्त नागपुरात राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद संपन्न


सावदा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे विवेक विचार मंचच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद नुकतीच पार पडली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले, तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पद्मश्री नामदेव कांबळे, विवेक विचार मंचचे अध्यक्ष प्रदीप रावत, विविमं कार्यवाह महेश पोहनेरकर, अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, आणि पुणे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नितीन गडकरी म्हणाले की, “आपण संत आणि महापुरुषांची जात नव्हे, तर त्यांचे कार्य पाहतो. कोणतीही व्यक्ती जात-पात किंवा धर्माने मोठी होत नाही, तर ती आपल्या गुणांमुळे मोठी होत असते. आपल्याला समाजातील आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करून, जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण करायचा आहे. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते.”

या प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले. भुसावळ, रावेर, जळगाव येथून अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित होते.