जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी विविध योजनांमधून तब्बल ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. या सौर पंपांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. मात्र, काही वेळा या पंपांमध्ये बिघाड झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय होत असे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महावितरणने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सौर कृषी पंपांच्या तक्रारी मोबाईल ॲपवरून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार नोंदवण्यासाठी वेबसाईट, संबंधित पुरवठादार कंपनीची वेबसाईट किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करणे असे तीन पर्याय होते. आता या पर्यायांमध्ये महावितरणच्या मोबाईल ॲपची भर पडली आहे. महावितरणचे हे ॲप वीज बिल पाहणे, बिल भरणे, मीटर रिडींग नोंदवणे अशा विविध कामांसाठी आधीच लोकप्रिय आहे. आता त्यात ‘सौर पंप तक्रार’ हा नवीन पर्याय समाविष्ट करण्यात आला आहे.
या सुविधेमुळे शेतकरी आता आपल्या स्मार्टफोनवरून अगदी सोप्या पद्धतीने सौर पंपाविषयीची तक्रार दाखल करू शकतील. तक्रार नोंदवताना शेतकऱ्याला केवळ सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पंप न चालणे, सौर पॅनेलची नासधूस, सौर ऊर्जा संच निकामी होणे, चोरी होणे किंवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी या ॲपद्वारे नोंदवता येतील.
विशेष म्हणजे, सौर कृषी पंप संचाचा विमा उतरवण्यात आला असून, पाच वर्षांपर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्या तक्रारीचे निवारण करणे पुरवठादार कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसवले आहेत, त्या जिल्ह्यात सेवा केंद्र उभारणे अनिवार्य आहे. तक्रारीचे निराकरण झाल्यावर शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे माहिती दिली जाईल. महावितरणच्या प्रत्येक मंडलातील अधीक्षक अभियंता कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर आणि तक्रारींच्या निराकरणावर बारीक लक्ष ठेवतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना त्वरित न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.