
मुंबई-वृत्तसेवा | हिंदी सक्तीचा निर्णय स्थगित करून राज्य सरकारने यासाठी समिती नेमण्याची घोषणा केल्यानंतर उध्दव व राज ठाकरे हे ५ जुलै रोजी विजयी मेळावा घेणार असून आज राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केल्याचा निषेध म्हणून उध्दव व राज ठाकरे यांनी एकत्रीतपणे विरोध केला. यासोबत ठिकठिकाणी आंदोलने सुरू करण्यात आली. तर या निर्णयाच्या विरोधात मुंबई येथे शिवसेना-उबाठा आणि मनसेने एकत्रीत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली. तथापि, याआधीच अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे दोन्ही जीआर मागे घेऊन यावर निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली.
यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मराठी जनांच्या रेट्यामुळे राज्य सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागल्याचे नमूद केले. सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नांनी हे झाल्याचे त्यांनी सांगितले. तर हा जनतेचा विजय असून याला साजरा करण्यासाठी 5 जुलै रोजी मोर्चा ऐवजी विजयी मेळावा घेण्यात येणार असून तो कोणत्याही एका पक्षाचा नसेल अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्यात मनसे सोबत शिवसेना-उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.



