जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी गुरुवार, २६ जून रोजी पाचोरा आणि भडगाव तालुक्यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव तालुक्यातील विविध शासकीय संस्थांना अचानक भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी प्रशासकीय शिस्त आणि कार्यक्षमतेचा कसून आढावा घेतला.
सीईओ करनवाल यांनी दौऱ्यादरम्यान शिरसोली येथील आरोग्य उपकेंद्रात पाहणी केली असता, तेथील आरोग्य सेविका आणि मदतनीस हे दोघेही गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेत, त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवून त्यांचे एक दिवसाचे वेतन थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे, पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता, एक शिक्षक कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याचे आढळले. या शिक्षकालाही नोटीस बजावत त्याचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दौऱ्यात करनवाल यांनी पाचोरा तालुक्यातील लसगाव येथील जिल्हा परिषद शाळेचीही पाहणी केली. येथे त्यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. याशिवाय, त्यांनी बांबूरुड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन तेथील सेवा-सुविधा, औषधसाठा आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती याचा सखोल आढावा घेतला.
या भेटींनंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेचे भान राखण्याचे, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आणि शिस्तबद्ध प्रशासन राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या या अनपेक्षित भेटींमुळे प्रशासकीय यंत्रणेत सतर्कता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.