मारवड येथील सेंट्रल बँकेकडून शेतकऱ्याची आर्थिक लूट!; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मारवड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. पीक कर्ज वेळेत फेडूनही बँकेने आपल्याला ३ टक्के सरकारी अनुदानाचा लाभ नाकारून आर्थिक फसवणूक केल्याचा दावा शेतकरी सुभाष निंबा वाडीले या माजी सैनिक शेतकऱ्याने केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सखोल चौकशीची मागणी करत न्याय मिळण्याची विनंती केली.

बँकेकडून आर्थिक लुटीचा आरोप
सुभाष वाडीले यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्यांचे पीक कर्ज १३ जून रोजी ३ लाख २० हजार रुपये भरून पूर्णपणे फेडले. नियमानुसार, जे शेतकरी आपले पीक कर्ज नियमितपणे फेडतात, त्यांना सरकारकडून ३ टक्के अनुदान मिळते. वाडीले यांनी बँकेला वारंवार या अनुदानाबाबत विचारणा केली, मात्र बँकेने त्यांना हा लाभ दिला नाही. यामुळे बँकेने आपली आर्थिक लूट केली असून, यामुळे आपण मानसिकदृष्ट्या त्रस्त झालो असल्याचे वाडीले यांनी निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी
खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन बँकेचे कर्ज मुदतीपूर्वी फेडले असतानाही बँकेने असे केल्याने आपली आर्थिक स्थिती आणि मानसिक संतुलन बिघडले असल्याचे वाडीले यांनी नमूद केले. बँकेच्या या अन्यायामुळे काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मारवड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वाडीले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.