कत्तलीसाठी बांधलेल्या ५ गुरांची सुटका, एक अटकेत !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या पाच गुरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यावल पोलिसांनी साकळी गावात ही कारवाई केली.

यावल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना गोपनीय माहिती मिळाली होती की, यावल तालुक्यातील साकळी गावातील उर्दू शाळेजवळ एका शेडमध्ये पाच गुरांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आले आहे. या माहितीची गंभीर दखल घेत, पोलीस निरीक्षकांनी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पथकाला दिले.

त्यानुसार, रविवार, २९ जून रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या शेडवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी शाहबाज खान लियाकत खान कुरेशी (वय २७, रा. साकळी, ता. यावल) या संशयित आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेल्या पाच गुरांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल साळुंखे यांनी या कारवाईत सहभाग घेतला, तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश रोहिल हे करत आहेत.