Home Cities मुक्ताईनगर हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात महामार्गाच्या कामामुळे अडथळा; ठेकेदाराचा निष्काळजीपणा !

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात महामार्गाच्या कामामुळे अडथळा; ठेकेदाराचा निष्काळजीपणा !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदौर-हैदराबाद महामार्गासाठी पूर्णा नदीवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठेकेदार कंपनीने पुलाच्या कामासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुरूम टाकल्यामुळे धरणाच्या बॅकवॉटरसाठी अडथळा निर्माण होत आहे. यामुळे आगामी पावसाळ्यात धरणाच्या जलसाठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पाटबंधारे बांधकाम विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून, संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणलोट क्षेत्रातील हा मुरूम तात्काळ हटवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाही ठेकेदाराकडून टाकण्यात आलेला मुरूम अद्यापही तसाच आहे. यामुळे यंदाच्या वर्षी हतनूर धरणातील जलसाठा कमी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असा मुरूम टाकल्याने पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि पावसाळ्यात येणारे पाणी पूर्ण क्षमतेने धरणात साठवले जात नाही. यामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाटबंधारे विभागाने तातडीने कठोर पाऊले उचलून ठेकेदाराला हा मुरूम हटवण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे नैसर्गिक जलसाठ्यावर येणारे संकट वेळीच टाळणे आवश्यक आहे.


Protected Content

Play sound