घरफोडीतील चोरटा सहा तासात जेरबंद; मेहुणबारे पोलीसांची कारवाई


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथे एका बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने ३ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, मेहूणबारे पोलिसांनी अवघ्या ६ तासांत या घरफोडीचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे, तसेच चोरीस गेलेले सोन्याचे दागिने वितळवून तयार केलेली लगडही जप्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक नामदेव पाटील (वय ४८, रा. देवळी, ता. चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबासह लग्नासाठी १६ मे रोजी सकाळी १० वाजता बाहेरगावी गेले होते. याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी शोकेसमधील लॉकर तोडून चोरट्याने ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पाटील यांनी २० मे रोजी मेहूणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत केवळ ६ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. अभिलेखावरील आरोपी प्रवीण सुभाष पाटील (वय ३२, रा. बिलवाडी, ता. जि. जळगाव) यास या गुन्ह्यात निष्पन्न करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांडमध्ये घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने चोरी केलेले सोन्याचे दागीने एका सराफाकडून वितळवून घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून ३३ ग्रॅम वजनाची, ३ लाख २० हजार रुपये किमतीची वितळवलेली सोन्याची लगड जप्त केली आहे.