Home Cities अमळनेर घरकुल अनुदान घेऊन बांधकाम न करणाऱ्यांवर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

घरकुल अनुदान घेऊन बांधकाम न करणाऱ्यांवर कारवाई करा; काँग्रेसची मागणी

0
164


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शासकीय घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाचे हप्ते मिळूनही घरकुलांचे बांधकाम अपूर्ण ठेवले आहे, तर काही लाभार्थ्यांनी तर अनुदान घेऊनही बांधकामाला सुरुवातच केलेली नाही. अशा लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि मोदी आवास योजनेच्या माध्यमातून गरजूंना घरकुल अनुदान वाटप केले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यात नव्याने ८ हजार घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यापैकी केवळ २ हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे, तर तब्बल ६ हजार घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत.

निवेदनात पुढे मागणी करण्यात आली आहे की, जे लाभार्थी खरोखर गरीब आणि गरजू आहेत किंवा ज्यांनी शासकीय अनुदानाच्या मदतीने आपल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे, अशा लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करावी. यामुळे त्यांना दिलासा मिळेल आणि योजनेचा खरा उद्देश सफल होईल. तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, डॉ. रवींद्र पाटील, शरद पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे, राजेंद्र नथु पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते. काँग्रेसच्या या मागणीमुळे घरकुल योजनेतील गैरव्यवहार आणि दिरंगाई समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound