अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेने युद्धपातळीवर नालेसफाईला सुरुवात केली आहे. शहरातील एकूण १८ लहान-मोठ्या नाल्यांची सफाई दोन जेसीबीच्या मदतीने करण्यात येणार आहे.
अमळनेर शहरात पिपऱ्या नाला, धुळे रोड, विप्रो नाला, पिंपळे रोड, ढेकू रोड यांसारखे एकूण १८ नाले आहेत. यामध्ये ८ मोठे आणि १० लहान नाले असून, वर्षभरात या नाल्यांमध्ये सुमारे ४०० टन गाळ साचतो. पावसाळ्यात हे नाले तुडुंब भरल्याने शहरातील वस्त्या, कॉलन्या आणि रस्त्यांवर घाण पाणी पसरते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. पावसाळ्याच्या ऐनवेळी नालेसफाई करणे शक्य नसल्याने, नगरपालिकेने आतापासूनच या कामाला सुरुवात केली आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी या कामासाठी विशेष पथक नेमले आहे. अभियंता डिगंबर वाघ, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, आरोग्य समन्वयक गणेश गढरी, मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, प्रवीण बिऱ्हाडे, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, भरत आगळे यांचा या पथकात समावेश आहे. या पथकाला एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून नालेसफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सध्या ढेकू रोड आणि आर.के. नगरच्या पाठीमागे नालेसफाईचे काम सुरू झाले आहे. ढेकू रोडच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात हिरवी वनस्पती वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले होते, ते जेसीबीच्या साहाय्याने काढले जात आहेत.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात विविध कॉलन्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आणि साथीच्या आजारांची शक्यता वाढते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दीड महिना आधीच नालेसफाई करून हा काढलेला गाळ भूमीभराव करण्यासाठी वापरला जाणार आहे.