
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरालगत गट क्रमांक ९ मध्ये मागील शंभर वर्षांपासून हिंदू नाथ जोगी समाजाची दफनभूमी आहे. या ठिकाणी समाजातील मयत व्यक्तींचे अंत्यसंस्कार आणि दफन विधी पार पडत आले आहेत. मात्र, सद्यस्थितीत एका व्यक्तीने सदर जागेवर स्वतःचा हक्क सांगत मालकी हक्काचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ही जागा नगरपालिका झोनमध्ये आरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे समाजातील बांधवांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.


हिंदू नाथ जोगी समाजाने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत नगरपालिका किंवा प्रशासन समाजासाठी नवीन अधिकृत दफनभूमीची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत कोणीही या जागेवर हक्क सांगू नये. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता मोहीम किंवा विकासकामे केली जाऊ नयेत, अन्यथा सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावेळी उपस्थित समाज बांधवांनी प्रशासनाला कळकळीची विनंती केली की, समाजाच्या धार्मिक आणि परंपरागत हक्कांचे संरक्षण करावे. अन्यथा, समाज पेटून उठेल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन अथवा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला असून, अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रसंगी हिंदू नाथ जोगी समाजाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि यावल पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, तसेच समाजाचे संजय जोगी, रमेश जोगी, शरद जोगी, शालिग्राम राजपूत, सचिन मोरे, मनोहर जोगी, पांडुरंग जोगी, अनिल जोगी आणि मयूर जोगी आदी समाज बांधव उपस्थित होते.


