Home Cities धरणगाव संत व महात्म्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी : हभप गजाननजी महाराज

संत व महात्म्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी : हभप गजाननजी महाराज


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सामाजिक रचनेत संत व महात्म्यांनी उभे केलेले कार्य हे संपूर्ण समाजासाठी दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वरसाडे येथील गोप्रेमी गजानन जी महाराज यांनी केले. धरणगाव येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था, हनुमान नगर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आपल्या दोन तासांच्या कीर्तनात गजानन महाराजांनी संतांनी गेल्या सातशे वर्षांपूर्वी समाजासाठी दिलेले योगदान आणि समरसतेच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकत समाजातील सर्व स्तरांसाठी प्रेरणा देणारे विचार मांडले.

धरणगाव येथे स्व. सुकनिवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताह 6 फेब्रुवारीपासून सुरू झाला होता आणि 14 फेब्रुवारी रोजी गोप्रेमी गजानन जी महाराज वरसाडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला. या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये संजय नाना महाराज धोंडगे (नाशिक), ज्ञानेश्वर महाराज कोठुळे (मुंबई), युवा कीर्तनकार कृष्णा महाराज पुंड (अहिल्यानगर), भागवताचार्य परमेश्वर महाराज उगले (तळवाडे, नांदगाव), युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे (भोकरदन), विनोदाचार्य गंगाराम महाराज राऊत (पैठण), ज्ञान सिंधू ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचा समावेश होता.

काल्याच्या कीर्तन समारोप प्रसंगी वारकरी संस्थेच्या वतीने पुढील वर्षी होणाऱ्या 36व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी कीर्तन सेवेचे यजमान निश्चित करण्यात आले. तसेच सप्ताहाच्या आयोजनात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सप्ताह काळात विविध सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक भाविकांनी आपल्या परीने मदत केली. यावेळी माऊली वारकरी संस्थेचे अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर भगवान बाबा यांनी संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या 60 ते 65 गोरगरीब व अनाथ विद्यार्थ्यांसाठी मदतीचे आवाहन केले. कपडे, शालेय साहित्य किंवा अन्नदान तसेच आर्थिक देणगी स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्या भाविकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. धरणगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडी 17 फेब्रुवारी 2025 रोजी सोमवार सकाळी 8 वाजता निघणार आहे. या पायी दिंडीमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound