औष्णिक विद्युत केंद्रातील अपघाताची मालिका थांबेना; महाजेनको प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

दिपनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र येथील 660 मेगा वॉट या नवीन प्रकल्पात सातत्याने अपघाताची मालिका सुरू असून या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याचे आढळून आले आहे. याकडे महाजेनको प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या माध्यमातून वेळोवेळी अपघातांची कारणे दाखवून देऊनसुद्धा महाजेनको प्रशासनाने कामगारांच्या जीविताशी खेळणाऱ्या दोषी कंपनींवर कुठलीही कार्यवाही न केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गेल्या आठवड्यात या प्रकल्पाचे बॉयलरचे काम सुरू असताना एका परप्रांतीय कामगाराचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर २ दिवसापूर्वी या प्रकल्पात भेल कंपनीच्या अधिपत्याखाली काम करीत असलेल्या इंडवेल कंपनीच्या अवजड क्रेंनला भीषण आग लागली होती. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून आग नियंत्रणासाठी युद्धपातळीवर प्रशासनाकडून सुरू आहे.

तसेच भेल कंपनीच्या अधिपत्याखाली काम करीत असलेल्या केसीएल कंपनीकडून विद्युत रोहित्र बसविण्याचे काम सुरू असून त्याठिकाणी कामगार काम करत असतांना कुठलेही सुरक्षा साधनांचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सदर काम संबंधित कंपनीच्या औद्यौगिक सुरक्षा अधिकाऱ्याच्या निगराणीत करणे गरजेचे असताना त्याठिकाणी संबंथित औद्यौगिक सुरक्षा यंत्रणेच्या गैरहजेरीमध्ये जोखमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत भेल कंपनीचे प्रकल्प संचालक जावडे वेळोवेळी संपर्क केला असता त्यांच्याकडून सदर अपघाताची घटनांबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसून ऐवढ्या मोठ्या पदावर कार्यरत अधिकाऱ्याकडून असे होऊ नये अशी अपेक्षा आहे.

एकंदरीत विचार केला असता महाजेनको प्रशासनाचा वचक भेल कंपनीवर नसल्याचे उघड उघड दिसत आहे. भेल कंपनीच्या अधिपत्याखाली कामे करीत असलेल्या कंपन्यांकडून फक्त कागदोपत्री सुर‌क्षा साधने पुरवली जात असून संपूर्ण प्रकल्पामध्ये सुरक्षा साधनांच्या वापराचा अभाव दिसत आहे.तसेच बरीच कामे कोणतेही वर्क परमीट न घेता केली जात असून महाजेनको प्रशासनाने भेल कंपनीवर ठोस कडक कार्यवाही करून भेल कंपनी कामगारांच्या जिवाशी खेळत असलेला खेळ थांबवावा. सदर भेल कंपनीवर महाजेनको प्रशासनाने वेळीच लगाम न लावल्यास भविष्यात सरकारी मालमत्तेची खूप मोठी हानी आणि जीवितहानी होणेबाबतीत शंकाच उरत नाही.

Protected Content