जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अनेकदा आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला असला तरी कधीही आपल्या उमेदवारीबाबत संशय व्यक्त केला नव्हता. आज मात्र त्यांनी रावेरातील कार्यक्रमात ‘पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी’ असल्याचे वक्तव्य करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. अर्थात, यामुळे त्यांच्या मनात विधानसभेच्या तिकिट वाटपावरून चलबिचल तर सुरू झाली नाही ना ? अशी चर्चा आता रंगली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कितीही दबावतंत्र वापरले तरी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. या पंचवार्षिकच्या विधानसभेतील शेवटच्या दिवशी त्यांनी अतिशय भावनिक भाषण करून पक्षाने आपली पाठराखण न केल्याबाबत खंत व्यक्त केली. तथापि, त्यांच्या या वक्तव्याकडे पक्षाने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले. यामुळे त्यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा निघाली. आज रावेर शहरात भाजपच्या मेळाव्यात भाषण करतांना एकनाथराव खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यांनी नेहमीप्रमाणे पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर विरोधी पक्षनेतेपदावरून थेट मंत्री झालेल्या विखे पाटलांनीही त्यांनी लक्ष्य केले. मात्र आजच्या भाषणात त्यांच्या एका मुद्दयाने राजकीय निरिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले की, ‘पक्ष तिकीट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे.’ ( याबाबतचे सविस्तर वृत्त आपण या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात. )
आजवर एकनाथराव खडसे यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा अनेकदा जाहीरपणे वाचला असला तरी तिकिटाबाबत ते कधीही बोलले नव्हते. आज मात्र त्यांनी पहिल्यांदाच तिकिट भेटो अथवा नको भेटो असे शब्द वापरल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकनाथराव खडसे यांच्या मतदारसंघातून (मुक्ताईनगर) त्यांच्या कुटुंबातील दुसर्या कुणालाही (शक्यतो त्यांची कन्या रोहिणीताई यांना) तिकिट मिळेल अशी चर्चा सुरू आहे. अर्थात, या गावगप्पांना कोणताही आधार नसून सध्या तरी पक्षाकडून तसे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र असे असतांनाही खडसे यांनी तिकिट मिळण्याबाबत संभ्रम असल्याचे वातावरण निर्मित केल्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे.
एकनाथराव खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडे साफ दुर्लक्ष करून पक्षश्रेष्ठींनी अतिशय ताठर भूमिका घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सातत्याने नाथाभाऊ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याची वक्तव्ये केली आहेत. खुद्द खडसे यांनीदेखील पक्षाच्या विरूध्द कोणतेही वक्तव्य केले नाही. अगदी आजदेखील रावेर येथील सभेत त्यांनी भाजपलाच विजयी करण्याचे आवाहन केले. मात्र हे करतांना तिकिट मिळो अथवा न मिळो हा त्यांचा पवित्रा सर्वांना नवीन वाटला. यातून नाथाभाऊंना भविष्याची चाहूल लागली का चर्चेत राहण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केले हे कुणालाही समजेनासे झाले आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रक्षाताई खडसे यांचे तिकिट कापले जाणार असल्याची आवई उठली होती. मात्र तसे काहीही झाले नाही. यामुळे नाथाभाऊंसारख्या मातब्बर उमेदवाराला पक्ष तिकिट नाकारणार ही बाब तशी सहजसोपी नाही. मात्र बोलले तर चर्चा होणारच…म्हणून नाथाभाऊंच्या आजच्या वक्तव्याने त्यांच्या मनातील चलबिचल उघड झाली आहे का ? याबाबत चर्चा रंगली आहे.