जळगाव जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, एमआयडीसीत नवीन उद्योग आणणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रूपये देण्यात येतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज संपन्न झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह‌ विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई- भूमिपूजन यावेळी संपन्न झाले. या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार आ.चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. लता सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलतांना‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ जळगावच्या पवित्र भूमित जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे पुढच्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्हीही हप्ते पडतील आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील. या महिन्यात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन – प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासनस्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार आहे. अशा‌ शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. तरूणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत‌. यात तरूणांना महिन्याला १० हजार मानधन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरु केले. केवळ वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा फायदा झाला. लेक लाडकी योजनेतून मुलींना वयाच्या १८ वर्षानंतर एक लाख रूपये मिळणार आहेत. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही यांची ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. श्री.समर्थ महिला बचत गट, अयोध्या नगर ( नागरी उपजिवीका मिशन अंतर्गत धनादेश वितरण ), तनिषा पोरवाल ५० लक्ष, शितल विसपुते २० लक्ष, अक्षिता पाटील १० लक्ष (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ धनादेश वितरण), माऊली महिला बचत गट, बिलवाडी, श्री.गणेश महिला बचतगट,बोरनार ( समुदाय गुंतवणूक निधी प्रत्येकी ६ लाख धनादेश वितरण) दुर्गा महिला बचत गट,चिंचखेडे प्र., कालिंका माता महिला बचत गट,चिंचगट प्र.( मानव विकास मिशन अंतर्गत ई-रिक्षा ), शितल वानखेडे, रोहन देसले ( मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नियुक्ती पत्र), आरती श्रीनाथ, सरला भिसे, निकीता पाटील, जागृती पाटील, पुजा श्रीनाथ ( पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत नियुक्ती पत्र ) जनाबाई कोळी, धानोरा, मीराबाई कसोदे पाळधी खु., शांताबाई गरजे बाभळे, आशा तडवी, आडगाव यांना (राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गत शबरी व रमाई घरकुल आवास योजना ) धनश्री नेमाडे, देवाश्री पाटील यांना (कृषी विभागामार्फत ड्रोन वाटप ), देवांश्री पाटील या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यातील‌ काही महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सर्वधर्मीय महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्यमंत्र्यांचे महिलांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कवियित्री बहिणाबाईंचा पुतळा व बचतगटांच्या वस्तूंचा संच देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी, जळगाव जिल्ह्यातील बहिणींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहलेले भावनिक पत्र जिल्ह्यातील बहिंणींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दोन बहिणींच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी या पत्राची दृकश्राव्य चित्रफित ही दाखविण्यात आली. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा डॉ.अमोल शिंदे यांनी सादर केली. सूत्रसंचालन‌ हर्षल पाटील आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

Protected Content