चहार्डी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

182 1829331 parent meeting clipart free download best parent meeting

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील चहार्डी येथील सरपंच उषाबाई रमेश पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावर काल (दि.२२) रोजी दुपारी १२.०० वाजता ग्रामसचिवालयाच्या सभागृहात चर्चा होऊन १२ विरुद्ध चार मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी पिठासन अधिकारी तहसीलदार अनिल गावित होते.

चहार्डी ग्रामपंचायत सदस्य प्रमिला प्रकाश पाटील, किरण विश्वनाथ चौधरी, लिलाबाई जंगलू भिल, संजय प्रताप मोरे, संदीप दत्तात्रय पाटील, तुळशीराम धनराज कोळी, जगदीश निंबा पाटील, प्रशांत नथू पाटील, वर्षा ज्ञानेश्वर पाटील, मीना अशोक पाटील, संगीता तुळशीराम कोळी, कल्पना योगेश महाजन, इंदूबाई रघुनाथ वारडे यांनी सरपंच उषाबाई रमेश पाटील यांच्याविरोधात गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावेळी सदस्यांनी हात उंच करून मतदान केले.

१७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जातपडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्यामुळे संगीता कोळी यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार पिठासन अधिकारी अनिल गावित यांनी त्यांना मतदानापासून अलिप्त ठेवले. सभेला उपस्थित १६ सदस्यांपैकी १२ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले तर सरपंच यांचेसह चार सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले.

शेवटी १२ विरोधात चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती पिठासन अधिकारी तथा तहसीलदार अनिल गावित यांनी दिली आहे. यावेळी मंडलाधिकारी एस. एल. पाटील, डी. आर. पाटील, सुरेश पाटील, तलाठी कुलदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी भदाणे यांनी सहकार्य केले. येथील शहर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content