लातूर येथील वर्किंग वुमन्स हॉटेलचे मंत्री महाजनांच्या हस्ते उद्घाटन

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खंडापूर रोडवरील उच्चस्तर आयटीआय इमारत परिसरात सुरु होत असलेल्या वर्किंग वुमन्स हॉस्टेलचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे आदी उपस्थित होते. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातून येवून लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय, निमशासकीय, सेवा क्षेत्रा कार्यरत असलेल्या महिलांच्या निवासाचा प्रश्न सोडवून त्यांना सुरक्षित निवासस्थान मिळावे, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी लातूर जिल्हा नियोजन समितीने वर्किंग वुमन्स हॉस्टेल सुरु केले आहे. पालकमंत्री ना. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या हॉस्टेलची प्रवेश क्षमता पहिल्या टप्प्यात 50 इतकी आहे. याठिकाणी प्रवेश घेणाऱ्या महिलांना मोफत निवास, कॉट, बेडिंग साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच इमारत परिसरात पार्किंग व्यवस्था, ग्रंथालय, इनडोअर क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Protected Content