मेहरूण तलावात जनावरे उतरविल्यास कारवाई करा : महापौर भारती सोनवणे

जळगाव, प्रतिनिधी । बऱ्याच वेळा मेहरूण तलावात मोठ्याप्रमाणात गुरे-ढोरे धुण्यासाठी उतरविले जातात. तलावात जाणारा जनावरांचा लोंढा तलावाचे पाणी तर खराब करतोच पण जाताना मनपा प्रशासनाकडून मेहरूण तलावाच्या काठी वृक्षारोपण करण्यात आले आहे या रोपांची देखील नासधूस करतो, यामुळे तलावात जनावरे उतरविल्यास कारवाई करावी, अशा सक्त सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या आहेत.

भारती प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त मेहरूण तलावाच्या किनाऱ्यावर सर्व पर्यावरणप्रेमी आज जमले होते. याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.महेंद्र काबरा, आनंद मल्हारा, सामाजिक वनीकरणचे अधिकारी मधुकर नेमाडे, विजय वाणी, चंद्रशेखर नेवे, प्रवीण पाटील, सुनील कुराडे, राहुल धांडे, आनंदराव मराठे, भारती प्रतिष्ठानच्या सुजाता देशपांडे, पप्पू ढाके, ऋषी राजपूत, बापू कोळी, वन्यजीव संरक्षण संस्थेचे वासुदेव वाढे, रविंद्र फालक, बाळकृष्ण देवरे, रविंद्र सोनवणे आदींसह इतर पर्यावरणप्रेमी व मनपाचे निरीक्षक उपस्थित होते. महापौर सोनवणे यांनी सर्व परिसराची पाहणी करून पर्यावरणप्रेमींकडून सध्यास्थितीबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांनी यावेळी सांगितले की, तलावात जनावरे धुणे नियमबाह्य आहे.  तलावात गुरे मोठ्या संख्येने येत असल्याने झुडपे पायदळी तुडविले जातात. गुरे तलावात धुण्यात येऊ नये. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घ्या : महापौर

तलावाच्या काठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तलाव परिसरात नियमीत फिरायला येणाऱ्यांनी एक झाड दत्तक घेत त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content