पाचोरा येथील बीएसएफ जवान चेतन हजारे यांचे मिझोराम कर्तव्यावर निधन !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील बीएसएफ जवान चेतन हजारे यांचे मिझोराम (मेघालय) येथे कर्तव्यावर असतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांचेवर पाचोरा येथे अश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी काळीज पिळवटून टाकणारे आई, वडिल, पत्नी, बहिण व मुलांचा दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील रहिवाशी चेतन प्रकाश हजारे यांना लहानपणापासूनच देशसेवा करायची जिद्द होती. अथक परिश्रम व मेहनतीच्या जोरावर या जिद्दीला सार्थक ठरवत अखेर चेतन हजारे यांना यश आले. व ते राजस्थान येथे सन – २०१४ मध्ये बीएसएफ मध्ये सेवा देण्यासाठी सज्ज झाले. कालांतराने विवाह होवुन दोन मुलांना सोबत ते सद्यस्थितीत कर्तव्यावर असलेल्या मिझोरम राज्यातील मेघालय येथील एझवाल सेक्टर मध्ये वास्तव्यास होते. परंतु नियमित श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असलेला चेतन यांचेवर काळाने घाला घातला. शनिवार १५ जुन रोजी ११:३० वाजता चेतन हजारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने क्षणातच होत्याचे नव्हते झाले. व चेतन हजारे यांचे दुःखद निधन झाले.

ही बातमी पाचोरा शहरात पोहचताच एकच खळबळ उडाली. अतिशय प्रेमळ व मितभाषी चेतन हजारे हा आपल्यात नाही हे कळताच त्यांचे आई, वडील, बहिण यांनी एकच टाहो फोडला. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. अवघ्या २९ वर्षीय चेतन यास हृदयविकाराचा झटका येवुन निधन होणे ही मनाला चटका लावुन देणारी घटना असल्याचे बोलले जात होते. दरम्यान चेतन हजारे यांचे पार्थिव इंदोर मार्गे सोमवारी १७ जुन रोजी सकाळी ८ वाजता पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथे आणण्यात आले. चेतन यांचे पार्थिव घरी आल्यानंतर आई, वडील, पत्नी, व बहिण यांचा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावुन सोडणारा होता. अखेर अश्रू नयनांनी चेतन हजारे यांना उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, आ. किशोर पाटील, मा. आ. दिलीप वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठासेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Protected Content