बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० मे रोजी संध्याकाळी तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदी हे कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकावर सुमारे 45 तासांचं मौनव्रत धारण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलीय. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील प्रचार संपवून पंतप्रधान मोदी हे वाराणसी येथून तिरुअनंतपुरम येथे दाखल झाले, त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कन्याकुमारी इथं पोहोचले.
विवेकानंद शिलास्मारकला जाण्यापूर्वी त्यांनी येथील भगवती अम्मन मंदिरात पूजन केले. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान मोदींचं स्वागत केले. त्यानंतर विशेष बोटीने ते विवेकानंद शिलास्मारकावर पोहोचले. तिथे पंतप्रधान मोदींनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते ध्यानाला बसले. स्वामी विवेकानंद ज्या ठिकाणी ध्यानाला बसले होते, त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सुमारे दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. 1 जूनला त्यांचे मौनव्रत पूर्ण होणार असून त्यानंतर ते राजधानी दिल्लीला रवाना होतील. 1 जूनला दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी स्मारकाशेजारी असलेल्या तिरुवल्लुवर पुतळ्याला भेट देण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध, मध्य समुद्रातील स्मारकात पंतप्रधान मोदींच्या 45 तासांच्या ध्यानधारणेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.