राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘या’ कारणासाठी ईडीच्या विरोधात निषेध आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी २२ मे रोजी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रस्त्यावर उतरून ईडीच्या विरोधात आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारकडून दबावतंत्राचा वापर करून लोकाभिमुख काम करणाऱ्या विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना नामोहरम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. ईडीच्या कारवाया चुकीच्या पद्धतीने सुरू असून त्या थांबवण्यात याव्यात, या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. या पुढच्या काळात ईडीचा गैरवापर थांबवला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, प्रवक्ता योगेश देसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content