इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार – उद्धव ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शत्रूत्व सर्वश्रूत आहे. पण आता ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनात कोणतीही आढी न ठेवता थेट मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत. यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे लवकरच शिंदेंच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यातच ठाकरेंनी शिंदेंचे आभार मानले आहेत हे विशेष.

मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण दिल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मी याक्षणी राजकारणावर फार बोलणार नाही. पण मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याचे सांगितले आहे. त्याविषयी मी त्यांना धन्यवाद देतो. आता एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेता हे आरक्षण काद्याच्या सर्व कसोट्यांवर टिकेल. त्यातून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल अशी आशा बाळगतो, असे ते म्हणाले.

मला खात्री आहे की ज्या पद्धतीने अभ्यास करून मराठा आरक्षणाचा मसुदा मांडण्यात आला आणि हे विधेयक मंजूर करण्यात आले त्यावरून हा कायदा सर्वच निकषांवर टिकेल असा मला विश्वास आहे. सभागृहात याविषयी समजून सांगण्याची गरज नव्हती. कारण सभागृहात एकमताने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. सरकारने शिक्षण व नोकऱ्यांत हे आरक्षण दिले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर हे अधिक स्पष्ट होईल. पण आता तातडीने मराठा समाजातील किती तरुणांना किती नोकरी मिळेल हे सरकारने सांगितले तर सोन्याहून पिवळे होईल, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठा समाजाचेही कौतुक केले. मराठा समाजाने एवढा मोठा लढा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. सरकारने हा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या प्रामाणिकतेवर मी शंका घेत नाही. पण त्यासाठी अनेकांना बलिदान द्यावे लागले. मी स्वतः मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात गेलो होतो. तिथे आंदोलकांवर अत्यंत निर्घृण व निर्दयीपणे अत्याचार करण्यात आला होता. त्यांची डोकी फोडण्यात आली होती. या कारवाईची काहीच गरज नव्हती. हा विषय शांततेत सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीत कोणतीही मतभिन्नता नसल्याचेही स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे आरक्षण सु्प्रीम कोर्टात टिकणार नसल्याचा दावा केला आहे. त्याविषयी ते बोलत होते. महाविकास आघाडीत या प्रकरणी 2 मते असण्याचा प्रश्नच येत नाही. असे काही असते तर हे विधेयक एकमताने पारित झालेच नसते. तुम्ही नीट समजून घ्या. मी मराठा समाजालाही सांगतोय. गेल्या महिन्यातही गुलाल उधळला गेला होता. पण नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आतासुद्धा सरकारने ज्या पद्धतीने हमी घेतली आहे ती निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे या प्रकरणी पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवर भरवसा ठेवणे कठीण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Protected Content