लक्ष्मी मिलची १२५ वर्षांपूर्वीची चिमणी अखेर जमीनदोस्त

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूरच्या एकेकाळच्या गिरणगावाची निशाणी असलेली लक्ष्मी-विष्णू कापड गिरणीच्या लक्ष्मी युनिटची सुमारे १२५ वर्षांची जुनी ५० फूट उंच चिमणी धोकादायक ठरल्याने गुरुवारी अखेर जमीनदोस्त करण्यात आली. ही चिमणी पाडल्यामुळे या कापड गिरणीच्या बेकार कामगारांचे वारसदार आणि कुटुंबीयांसह आधुनिक सोलापूरचे इतिहासप्रेमी दुखावले गेले.

मुंबईत औद्योगिक क्रांती झाल्यानंतर त्यापाठोपाठ १८७७ साली सोलापुरात, सोलापूर स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल अर्थात जुनी कापड गिरणी उभारली गेली. त्यापाठोपाठ लक्ष्मी-विष्णूसह जामश्री मिल, नरसिंग गिरजी अर्थात वारद मिल अशा कापड गिरण्यांची उभारणी झाली होती. त्यामुळे सोलापूरची गिरणगाव या नावाने ओळख झाली होती. परंतु नंतर या कापड गिरण्या बंद पडल्या. ब्रिटीशकालीन लक्ष्मी-विष्णू कापड गिरणी १९६६ साली दिवंगत उद्योगपती, क्रिकेटपटू माधवराव आपटे यांनी विकत घेऊन चालविली घेतली असता १९९४ साली ही कापड गिरणी बंद पडली. कामगारांसह इतर कृणकोंचे देणे भागविण्यासाठी या कापड गिरणीची जमीन २००४ साली लिलालाद्वारे विकण्यात आली. निझामाबादच्या ट्रान्स एशियन कंपनीने ही जमीन खरेदी केली. नंतर अंतरिक्ष मल्टिकॉम प्रा. लि. कंपनीने ही जमीन ताब्यात घेतली. अलिकडे या जमिनीवर निवासी संकुले उभारण्यात आली आहे.

लक्ष्मी मिलच्या जागेवर असलेली ५० मीटर उंच चिमणी अलिकडे धोकादायक स्थितीत होती. या चिमणीच्या बांधकामाची तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी केली असता चिमणी नैऋत्य दिशेला तीन फूट कलल्याचे दिसून आले. दरम्यान, याबाबतचा अहवाल सोलापूर महापालिकेने विचारात घेऊन पुन्हा तपासणी केली. यात चिमणी धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष काढून पालिका प्रशासनाने ही चिमणी पाडून टाकण्याबाबत नोटीस बजावली. त्यानुसार सुमारे १२५ वर्षांची चिमणी मुंबईतील एका ठेकेदारामार्फत जमीनदोस्त करण्यात आली. विष्णू मिलची चिमणीही यापूर्वी धोकादायक असल्याची सबब पुढे करून पाडण्यात येत होती. परंतु वारसा वास्तू जतन होण्यासाठी नागरिकांनी विरोध केल्यामुळे काळ्या दगडी बांधकामाची ही चिमणी वाचली आहे.

Protected Content