ओमायक्रॉनच्या संसर्ग टाळणे अशक्य; पण घाबरू नका !

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग प्रचंड गतीने होत असतांनाच आता तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार ओमायक्रॉनचा संसर्ग कुणालाही टाळता येणार नसला तरी याला न घाबरता प्रतिकार करता येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. यातच आता आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल यांनी दिलेली माहिती महत्वाची मानली जात आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना डॉ. मुलायम म्हणाले की, करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही. नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली.

ते पुढे म्हणाले की, कोरोना या रोगाची नैसर्गिक प्रगती थांबवणार नाहीत. तसेच त्यांनी लक्षणे नसलेल्या बाधितांच्या जवळच्या लोकांच्या करोना चाचणीला विरोध केलाय. त्यांच्यामते या विषाणूचा संसर्ग अवघ्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे, त्यामुळे करोना चाचणीचा रिझल्ट येईपर्यंत बाधित व्यक्तीमुळे अनेक लोकं संक्रमित झाली असू शकतात. अशा परिस्थितीत चाचणी करण्याचा फायदा होणार नाही आणि त्यामुळे करोनाच्या फैलावात देखील काही फरक पडणार नाही. अलीकडेच सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नसला तरी कुणी घाबरण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.