छत्रपती संभाजी महाराज नगर-वृत्तसेवा | हिंगोली व नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याचे वृत्त असून यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, आज पहाटे मराठवाड्यातील काही परिसराला भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या धक्क्यांची ठिकठिकाणची तीव्रता ही ३.६ ते ४.५ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून यात वित्त वा प्राणहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. तर दोन धक्के बसल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घरातून बाहेर पळत आले. भूकंपामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. तर प्रशासनाने मात्र कुणीही घाबरू नये असे आवाहन केले आहे. १९९३ साली किल्लारी येथे आलेल्या भूकंपाच्या आठवणी यामुळे जागृत झाल्या आहेत.