बारावीच्या गुणपत्रिकेवर नसेल नापासचा शेरा !

state board

मुंबई प्रतिनिधी । बारावी परिक्षेच्या गुणपत्रकावर आता नापास हा शेरा नसेल. याबाबतचा शासनादेश म्हणजेच जीआर नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

दहावी विद्यार्थ्यांना २०१६ पासूनच गुणपत्रिकेवर नापासचा शेरा देण्याचे बंद झाले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाने दहावी आणि बारावीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. नापासऐवजी कौशल्य विकासास पात्र असा शेरा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याच जीआर आधारे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवा शासनादेश जारी केला आहे. त्यानुसार यंंदा बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. यात एखादा विद्यार्थी नियमित परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात नापास किंवा श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात नापास असल्यास पुरवणी परीक्षेस पात्र असा शेरा देण्यात येणार आहे. जुलै-ऑगस्ट २०२० च्या पुरवणी परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांच्याही गुणपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेत श्रेणी विषयासह एक किंवा दोन विषयात श्रेणी विषयासह नापास असल्यास पुरवणी परीक्षेस पात्र असा शेरा गुणपत्रिकेत दिला जाणार आहे. श्रेणी विषयासह तीन किंवा ३ पेक्षा अधिक विषयात नापास असल्यास त्याला कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र शेरा दिला जाईल. दरम्यान, पुरवणी परीक्षेस पात्र वा कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र असा शेरा गुणपत्रिकेवर असला तरी पास किंवा नापासचा अर्थ लावायचा झाला तर तो विद्यार्थी नापासच असा अर्थ राहील.

Protected Content