जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीसोबत स्कूल व्हॅन चालकाकडून गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार १२ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक ४ वर्षीय बालिका जळगावातील एका शाळेत शिक्षण घेते. चिमुकलीला सकाळी शाळेत सोडण्यासाठी तिचे वडील जातात तर घेण्यासाठी स्कूल व्हॅन लावलेली आहे. १२ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता रोजी चिमुकली स्कूल व्हॅन क्रमांक (एमएच १३ एझेड १११८) ने घरी आली. घराजवळ उतरून घरी आल्यावर तिने व्हॅन चालक काकांनी बॅड टच केल्याची माहिती तिच्या आईला दिली. चिमुकलीच्या आईने तिला गुड टच आणि बॅड टच याबाबत शिकवले असल्याने तिने हे सर्व घरी सांगितला.
दरम्यान, पिडीत चिमुकलीच्या आईने हा प्रकार दुसऱ्या दिवशी शाळेत जावून मुख्याध्यापिकेला सांगितला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी १७ मार्च रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी स्कूल व्हॅन चालक कैलास उर्फ प्रदीप रमेश गायकवाड (वय-४०, रा. ओम साई नगर, जळगाव) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात संशयित आरोपी कैला गायकवाड याला अटक केली आहे. पुढील तपास एपीआय रविंद्र बागुल हे करीत आहे.