मविआचे अजून काही ठरेना : जळगाव व रावेरातील जागांवर खल सुरूच !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | भारतीय जनता पक्षाने जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून चार दिवस उलटून गेल्यावरही महाविकास आघाडीच्या वतीने अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. यामुळे अद्यापही जागांचा सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागांवर अनुक्रमे रक्षा खडसे व स्मीता वाघ यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आधी रावेर मतदारसंघ हा कॉंग्रेसकडे होता. या वेळेस हा मतदारसंघ राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या जळगाव लोकसभेवरून शिवसेना-उबाठा लढणार असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीने तगडे उमेदवार देण्याची रणनिती आखली आहे.

शरद पवार गटातर्फे रावेरमधून आधी एकनाथ खडसे लढविणार असल्याची चर्चा सुरू होती. नंतर मात्र त्यांनी वैद्यकीय कारणावरून माघार घेतली. यामुळे रोहिणी खडसे यांचे नाव पुढे आले. तर त्यांनी देखील आपण विधानसभा लढविणार असल्याचे सांगितले. यामुळे सध्या तरी रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आदींची नावे तिकिटाच्या शर्यतीत आहेत.

दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना-उबाठाला सुटणार असून यात अलीकडेच पक्षात आलेल्या अमळनेरच्या ललीताताई पाटील, जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने या तिघांपैकी एकाला तिकिट मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या वतीने दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असून तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Protected Content