जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बी.जे. मार्केट येथील गुरुनानक ट्रेडर्स नावाची दुकान फोडून २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या दोन विधी संघर्षित बालकांसह चौघांना जिल्हापेठ पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे. चौघांना गुरुवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता गणेश नगरातून ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट येथील गुरुनानक ट्रेडर्स नावाचे सबमर्सिबल स्पेअर पार्ट दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी गन मेटल, बुश कॉपर स्टील, कॉन्टॅक्ट किट, २१ हजार ६०० रोकड आणि मोबाईल असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील चोरटे हे रिक्षामध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पो.कॉ. मिलिंद सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश राकेश माणगावकर यांना माहिती दिली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पथकातील पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनावणे, अमित मराठे, तुषार पाटील यांनी कारवाई करत शहरातील गणेश नगरातून दोन विधी संघर्षित बालकांसह संशयित आरोपी गोलू उर्फ राज मनोज अहिरे (वय-२१, रा. खंडेराव नगर) आणि योगेश रमेश बनसोडे (वय-२१, रा. पिंप्राळा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालांपैकी १ लाख १ हजारांचा मुद्देमाल आणि रिक्षा ताब्यात घेतले आहे.