जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरातील वादासंदर्भात समजूत काढल्याचा राग आल्याने संतोष उर्फ उमाकांत वसंतराव बाविस्कर (वय- ५९, रा. पारख नगर, जळगाव ) यांना त्यांच्या लहान भावाच्या पत्नीने, तिच्या आई-वडील यांनी मारहाण करत धमकी दिली. ही घटना मंगळवारी ६ फेब्रवारी रोजी पारखनगरमध्ये घडली होती. या प्रकरणी शनिवार, १० फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पारख नगरात संतोष बाविस्कर हे त्यांचा लहान भाऊ दत्ताराज बाविस्कर, लहान भावाची पत्नी सुनयना उर्फ शीतल बाविस्कर, त्यांची मुले असे एकत्र कुटुंबात राहतात. ६ फेब्रुवारी रोजी कौटुंबिक कारणावरून संतोष बाविस्कर व सुनयना यांच्यात शाब्दीक वाद झाला. हा प्रकार सुनयनाने तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर तिचे वडील कमलाकर वाणी, आई वनिता वाणी, जीवन वासूदेव वाणी यांनी संतोष बाविस्कर यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच तू शेतावर कसा जातो, अशी धमकी देत सुनयना हिने मारहाण केली.

या मारहाणीत संतोष बाविस्कर यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी १० फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.



