


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद बांधकाम विभाग चाळीसगाव येथील उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदिप विरूचंद गमे या दोघांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एकूण बिलाच्या १ टक्का लाचेची मागणी करण्यात आली होती. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गावहाळचे काम घेतले होते, जे तक्रारदार यांनी पूर्ण केले होते. या पूर्ण झालेल्या कामांचे एकूण १०,४७,८४३ रुपयांचे बिल अदा करण्यासाठी, मोजमाप पुस्तिकेत नोंदी करून मूल्यांकन करणे गरजेचे होते. यापुढील कार्यवाहीसाठी ही फाईल उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे पाठवण्यात आली होती.
३ जुलै २०२६ रोजी तक्रारदार यांनी निनावे यांची कार्यालयात भेट घेतली असता, त्यांनी एकूण बिलाच्या १ टक्क्याप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी ७ जुलै २०२६ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवली.
या तक्रारीच्या आधारे आज ७ जुलै रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. कार्यालयात रचलेल्या सापळ्यात, उपविभागीय अभियंता निनावे यांनी तक्रारदार यांच्याकडून ही लाचेची रक्कम त्यांचे सहायक कुलदिप गमे यांच्या हस्ते स्वीकारली. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे आणि प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे ला.प्र. विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील आणि जगदीश बडगुजर यांनी केली आहे



